राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
१. कनिष्ठ लिपीक
२. पूर्णवेळ ग्रंथपाल
३. प्रयोगशाळा सहाय्यक
उपरोक्त मान्यता खालील अटींच्या अधिन राहून प्रदान करण्यात येत आहे:-१. संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये खाजगी मान्यता प्राप्त शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतूदी विहीत करण्यात आल्या आहेत. या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्र. ५ अन्वये देण्यात आल्या आहेत. सबब, सदर पदे १०० टक्के सरळसेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे, ही बाब विचारात घेण्यात यावी.
काही संस्थांमध्ये संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थश्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता आहे. यापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रचलित पध्दतीनुसार सदर पदे ५० टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे.
प्रस्तावांतर्गत पदे १०० टक्के सरळसेवेने भरण्याबाबतची बिंदुनामावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करुन घेण्यासाठी सादर करतेवेळी चतुर्थश्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचा-यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छूक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदुनामावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक राहील.
सर्व विभागीय आयुक्त (मागासवर्ग कक्ष) यांना सूचित करण्यात येते की, ज्या संस्था प्रस्तावांतर्गत पदे १०० टक्के सरळसेवेने बिंदुनामावली नोंदवही तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी परिच्छेद ३ मध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये.
परिच्छेद क्र.३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापनांनी स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदुनामावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक राहील. चूकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिका-याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खिळ बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दूसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे. या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदभरती करणेस मान्यता देण्यात आली होती. त्याच धर्तीवर या आदेशान्वये जी पदे १०० टक्के सरळसेवेने भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे, त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीची अट लागू राहील.
उपरोक्तप्रमाणे मान्यता देण्यात आलेली पदे शासन मान्य विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन भरण्यात आली आहेत किंवा कसे, तसेच पदभरतीवेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करुन अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी यांनी करावी.