संत गाडगे बाबा (Saint Gadge Baba) यांचे शिक्षण आणि समाजकार्य
संत गाडगे बाबा(दि. २३ फेब्रुवारी, १८७६ – २० डिसेंबर, १९५६)
(अल्प परिचय)
थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. जन्म शेणगाव (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथे. आडनाव जाणोरकर. वडील झिंगराव (झिंगराजी) व आई सखुबाई यांचे हे एकुलते एक अपत्य. त्यांचे त्यांच्या आईने ठेवलेले मूळ नाव डेबूजी यांचे घराणे मूळचे सुखवस्तू. व्यवसाय शेतीचा होता. वडीलांचे निधन (१८८४) झाल्यानंतर सखुबाई डेबूर्जीसह माहेरी (दापुरे गावी, ता. मूर्तिजापूर) येऊन राहिल्या. आजोळी डेबूजी गुरे राखीत असे व भजन करीत असे. या वयातच त्यांनी मुलांची भजनी मंडळे तयार केली होती. लहानपणापासूनच ते जातिभेद, हिंसात्मक कुळधर्म, चालीरीती मानीत नसत. पुढे डेबूजी मामाचे शेतकामही चांगले करू लागले. सन १८९२ मध्ये त्यांचा कुंताबाईंशी विवाह झाला. त्यांना अलोका, मुद्गल, कलावती व गोविंदा अशी चार अपत्ये होती. सन १९०५ पासून डेबूजीबाबांनी स्वतःला लोकसेवेसाठी वाहून घेतले. संसारत्याग करून ते साधकावस्थेत तीर्थयात्रा करीत फिरत होते. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.
डेबूजींना लहानपणापासूनच भजन-कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणा व लोकशिक्षण यांसाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर होते तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या ह्रदयाला जाऊन भिडणारी होती. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागांत व महाराष्ट्रात त्यांनी कीर्तने करून लोकजागृती केली. भजन-कीर्तनांतून प्रश्नोत्तररूपी संवाद हे डेबूजींचे वैशिष्ट्य होते. चोरी करू नये, तसेच चैन, देवाची यात्रा, दिवसवारे हे प्रकार कर्ज काढून करू नये, देवा-धर्माच्या नावाने नवस-सायास करू नये, यासाठी मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नये, शिवाशीव पाळू नये, दारू पिऊ नये, हुंडा देऊ घेऊ नये, आई-वडिलांची सेवा करावी, भुकेल्याला अन्न द्यावे, मुलांना शिकविल्याविना राहू नये, हे त्यांच्या कीर्तनांतून समाजप्रबोधनाचे मुख्य विषय असत. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा” असा गजर ते मुदयाच्या शेवटी करत व त्यात श्रोत्यांनाही सामील करून घेत. श्रोत्यांना सहभागी करून घेणे हे त्यांच्या कीर्तनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय.
डेबूजी पुढे गाडगे महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे व एक काठी (सोटा) असा त्यांचा वेश असे. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” असे त्यांचे मानववादी व समाजवादी तत्त्वज्ञान आहे. तसेच त्यांचा स्वच्छता, प्रामाणिकपणा, भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. समाजात शिक्षण प्रसार करुन अनेक संस्थांना मदत केली. सन १९५२ साली त्यांच्या भक्तांनी “श्री गाडगे महाराज मिशन ” या नावाने संस्था स्थापन केली आहे.लोकजागृतीसाठी प्रवास करीत असतानाच अमरावतीजवळ त्यांचे दि. २० डिसेंबर, १९५६ रोजी निधन झाले. वांद्रे (मुंबई) येथील पोलीस केंद्रात दि. ८ नोव्हेंबर, १९५६ रोजी झालेले त्यांचे गाजलेले कीर्तन अखेरचे ठरले. अमरावती येथे त्यांची समाधी आहे. सन २००५ साली अमरावती विद्यापीठाचे नाव “संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ” असे करण्यात आले.