परिविक्षाधीन शिक्षकांना (सहायक शिक्षक) रजा संंबंधी नियम व अधिकार
महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी सेवा नियमांचे विविध कायदे आणि नियमावली आहेत. विशेषतः परिविक्षाधीन (Probationary) (सहायक शिक्षक) शिक्षकांना कोणत्या प्रकारच्या रजा मिळू शकतात, याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ आणि महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती (नियमावली) १९८१ यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे.
परिविक्षाधीन शिक्षकांची (सहायक शिक्षक) सेवा मुदत
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ च्या कलम ५ (२) नुसार, सहायक शिक्षक म्हणून (सहायक शिक्षक) परिविक्षाधीन (Probationary) नेमणूक झालेल्या व्यक्तीस तीन वर्षे परिविक्षाधीन कालावधी असतो. या कालावधीत शिक्षकांची कामगिरी, उपस्थिती आणि शालेय व्यवस्थापनाकडून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता तपासली जाते.
परिविक्षाधीन शिक्षकांना रजा संंबंधी नियम
महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती (नियमावली) १९८१ मधील नियम १६ (२३) नुसार परिविक्षाधीन (अस्थायी) कर्मचाऱ्याला केवळ नैमितिक रजा (Casual Leave) आणि प्रसूती रजा (Maternity Leave) यांचा लाभ मिळतो. याशिवाय, अन्य कोणतीही रजा मिळण्याचा त्यांना हक्क नाही.
परंतु, जर शिक्षकाची तीन वर्षे परिविक्षाधीन सेवा पूर्ण झाल्यानंतर स्थायी पदावर नियुक्ती झाली, तर त्याच्या पूर्वीच्या सलग सेवेचा विचार करून, जर त्या कालावधीत तो स्थायी असता तर त्यास जी रजा लागू झाली असती, ती मिळण्याचा त्यास अधिकार असेल.
अन्य रजा आणि शासन निर्णय
शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या काही महत्त्वाच्या रजा पुढीलप्रमाणे आहेत –
- अर्जित रजा (Earned Leave)
- वैद्यकीय रजा (Medical Leave)
- बाल संगोपन रजा (Child Care Leave – CCL)
- विशेष रजा (Special Leave)
परिविक्षाधीन (सहायक शिक्षक) कर्मचाऱ्यांना या रजा थेट लागू होत नसल्या, तरी त्यांच्या स्थायीत्वानंतर त्या सेवेचा विचार होतो.
शिक्षकांनी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
- परिविक्षाधीन शिक्षकांना नैमितिक व प्रसूती रजा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची रजा मिळत नाही.
- स्थायी पदावर नियुक्ती झाल्यावर, मागील सलग सेवेनुसार रजा मिळू शकते.
- शासन निर्णयानुसार, खाजगी शाळांतील शिक्षकांसाठी अर्जित, वैद्यकीय, बाल संगोपन व इतर विशेष रजा लागू असतात.
परिविक्षाधीन (सहायक शिक्षक) शिक्षकांनी त्यांच्या सेवेमधील हक्क व अधिकार समजून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रके आणि नियमांची माहिती ठेवल्यास त्यांच्या सेवेसंदर्भातील संधी आणि मर्यादा स्पष्ट होतील. तसेच, स्थायी पदावर नियुक्तीनंतर उपलब्ध होणाऱ्या विविध रजा यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणेही गरजेचे आहे.
