विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांना निर्देश
‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे आदेश
मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करून शिक्षण अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतीप्रधान करण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, याची शाळांनी दक्षता घ्यायची आहे.
दप्तराच्या वजनावर शाळांनी ठेवायचे लक्ष
जड दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे आणि शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज गरजेपेक्षा जास्त पुस्तके, वह्या किंवा शैक्षणिक साहित्य आणावे लागू नये, यासाठी शाळांनी योग्य नियोजन करावे.
पूर्व-प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शक्यतो दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, अशा पद्धतीने शैक्षणिक नियोजन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक दिवसासाठी आवश्यक पुस्तके आणि वह्याच विद्यार्थ्यांनी आणाव्यात, यासाठी वर्गनिहाय ‘दप्तर वेळापत्रक’ तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.
शाळेत पुस्तके ठेवण्याची व्यवस्था
दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची गरज पडू नये यासाठी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा सुरक्षित लॉकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत.
तसेच घरातून जड पाण्याची बाटली आणण्याची आवश्यकता कमी करण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
ताज्या घडामोडी (Live Updates)
वर्षातून १० दिवस ‘दप्तरविरहित’
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाणार आहे. स्थानिक कारागीर आणि व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलप्रमाणे उपक्रम घेता येतील :
- सुतारकाम
- बागकाम
- मातीची भांडी बनविणे
- हस्तकला
- कृषीविषयक उपक्रम
- स्थानिक व्यवसायांची ओळख
यासोबतच वर्षभरात क्रीडा, बौद्धिक खेळ, वाचन, कथाकथन, पर्यावरण संवर्धन आणि क्षेत्रभेटी यांसारखे कृतीप्रधान दिवस आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दप्तराचे वजन नियमित तपासावे
शाळांनी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या दप्तराचे वजन नियमितपणे तपासून त्याची नोंद ठेवावी. दप्तराचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास तातडीने आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश आहेत.
पालक सभांमधूनही विद्यार्थ्यांच्या दप्तरात अनावश्यक वस्तू ठेवू नयेत, याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
मुख्याध्यापकांची प्राथमिक जबाबदारी
‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहणार आहे.
तसेच शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी शाळांना अचानक भेटी देऊन दप्तराचे वजन, दप्तर वेळापत्रक आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांची तपासणी करावी. शाळानिहाय अनुपालन अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे दप्तर हलके, शिक्षण अधिक आनंददायी
दप्तराचे वजन कमी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, अनुभव आणि स्थानिक कौशल्यांमधून शिकण्याची संधी देणे, हा या धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे ‘जड नाही, गोड दप्तर’ या संकल्पनेला चालना मिळून शाळेतील शिक्षण अधिक आनंददायी आणि विद्यार्थीकेंद्रित होण्यास मदत होणार आहे.
स्कूल बॅग पॉलिसी २०२०, दप्तराचे वजन, विद्यार्थ्यांचे दप्तर, दप्तरविरहित दिवस, जड नाही गोड दप्तर, महाराष्ट्र शाळा नियम, दप्तराचे ओझे कमी










