PAT प्रश्नपत्रिका फुटली; अज्ञात युट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल
पुणे | प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र पुणे मार्फत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी (PAT) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रश्नपत्रिका तसेच ती कशी सोडवावी यासंदर्भातील व्हिडिओ एका अज्ञात युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या प्रकारामुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली असून, राज्य शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात युट्यूब चॅनेल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय शिक्षण विभागाच्या STARs (Strengthening Teaching-Learning and Results for States) उपक्रमांतर्गत ही परीक्षा घेण्यात येत असून, यामध्ये गुप्तता राखणे अत्यावश्यक होते. मात्र, SCERT आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता परीक्षा प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली.
या प्रकरणी ‘महा विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम १९८२’ मधील कलम ५ आणि ६, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत अज्ञात युट्यूब चॅनेल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिक तपास करत असून, प्रश्नपत्रिका गळतीमागचे सूत्रधार कोण हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिक्षण विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले असून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत.