MahaTET 2025: ‘या’ भाषा माध्यमांच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रात मोठा बदल; २३ नोव्हेंबरला परीक्षा, संपूर्ण यादी तपासा!
MahaTET Exam 2023 News: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) काही विशिष्ट भाषा माध्यमांच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बंगाली, कन्नड, तेलुगू आणि गुजराती माध्यमांतून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी असल्याने, त्यांच्यासाठी काही ठराविक जिल्ह्यांमध्येच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
पुणे:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यात २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी ४ लाख ७९ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मात्र, काही भाषा माध्यमांतील उमेदवारांची संख्या कमी असल्याने परीक्षा परिषदेने नियोजन आणि व्यवस्थापनाच्या सोयीसाठी मर्यादित परीक्षा केंद्रे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या माध्यमांतील उमेदवारांना परीक्षेसाठी इतर जिल्ह्यांमध्ये प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
भाषा माध्यमनिहाय निश्चित केलेली परीक्षा केंद्रे
उमेदवारांनी आपल्या माध्यम आणि जिल्ह्यानुसार परीक्षा केंद्र काळजीपूर्वक तपासावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.
१. बंगाली माध्यम:
- पुणे केंद्र: मुंबई, पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार, जालना या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी.
- चंद्रपूर केंद्र: नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी.
२. कन्नड माध्यम:
- ठाणे केंद्र: मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी.
- सोलापूर केंद्र: पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी.
- सांगली केंद्र: कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी.
३. तेलुगू माध्यम:
- पुणे केंद्र: राज्यातील तेलुगू माध्यमातून परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एकमेव केंद्र.
४. गुजराती माध्यम:
- ठाणे केंद्र: मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी.
- नंदुरबार केंद्र: नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, बुलडाणा या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी.
परीक्षेचे वेळापत्रक
- पेपर एक (पहिली ते पाचवी): सकाळच्या सत्रात आयोजित केला जाईल.
- पेपर दोन (सहावी ते आठवी): दुपारच्या सत्रात आयोजित केला जाईल.
नोंदणी वाढण्यामागे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असलेल्या आणि पदोन्नतीसाठी इच्छुक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. या निकालानंतर जे शिक्षक सेवेत असूनही टीईटी पात्र नाहीत, त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक शिक्षक संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, नोकरी टिकवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी हजारो शिक्षकांनी यावेळच्या टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ज्यामुळे एकूण अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे.
































